कार्तिकी एकादशीचा (Kartiki Ekadashi) यंदाचा सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 4 नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पंढरपूरात येणार्या भाविकांना दर्शन मिळावं यासाठी विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं (Vitthal Rukmini Mandir) 24 तास खुलं ठेवलं जाणार आहे. आज सकाळी 11 वाजाता 'देवाचा पलंग निघाला' आहे. देवाचा पलंग निघणं म्हणजे विठूरायाची रात्रीची झोप बंद करून आता तो भक्तांना दर्शनासाठी 24 तास सज्ज राहणार आहे. विठूरायासोबत रूक्मिणी मातेचा देखील पलंग काढून ठेवला जातो.
दरम्यान यंदा 2 वर्षांनंतर कार्तिकी एकादशी कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरी होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून जे दूरूनच विठूरायाचं दर्शन घेत होते ते आता थेट मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊ शकणार आहेत. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी यासाठी विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन बंद राहणार आहे. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी खुले असणार आहेत. नक्की वाचा: Tulsi Vivah 2022 Dates: तुलसी विवाह यंदा कधी? इथे जाणून घ्या तारखा .
कार्तिकी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री सपत्निक करतात. यंदा तो मान देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना मिळेल. तर त्यांच्यासोबत एक सामान्य जोडपं देखील विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करतं. आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास देखील कार्तिकी एकादशी दिवशी संपतो. या दिवशी महाराष्ट्रातील विठ्ठल-रूक्मिणीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. ज्यांना पंढरपूरात येणं शक्य नसतं ते जवळच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात.