International Youth Day 2024 Date: देशातील तरुणांच्या योगदानावर राष्ट्राची प्रगती (Nation's Progress) आणि राष्ट्राचा विकास (Nation's Development) अवलंबून असतो. देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे तरुणांचा विकास आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील. तरुणांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या माध्यमातून तरुणांना त्यांचे काम आणि त्यांचे उपक्रम जागतिक स्तरावर दाखवण्याची संधी मिळते.
आंतरराष्ट्रीय युवा दिन तारीख -
आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांचा आवाज, कृती आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट 2000 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 17 डिसेंबर 1999 रोजी हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. यानंतर, 2000 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आतंरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. (International Youth Day 2 Quotes: जागतिक युवा दिन निमित्त Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत तरूणाईला द्या शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास -
संयुक्त राष्ट्र संघाने 1985 हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 1995 मध्ये युवकांसाठी जागतिक कार्यक्रम सुरू केला. 1998 मध्ये लिस्बन, पोर्तुगाल येथे झालेल्या जागतिक युवा परिषदेत युवकांच्या विकासाचे आणि सहभागाच्या महत्त्वावर जोर देण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने 1999 मध्ये 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश -
आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांची भूमिका आणि योगदान ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. तरुणांशी संबंधित समस्यांबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.
आंतरराष्ट्रीय युवा दिन 2024 ची थीम -
आंतरराष्ट्रीय युवा दिन 2024 ची थीम 'क्लिक्स टू प्रोग्रेस: युथ डिजिटल पाथवेज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट' अशी आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या दिशेने प्रगती करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हा या थीममागील उद्देश आहे.