Holika Dahan 2019: हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?
Holika Dahan 2019 (Photo Credits: Getty Images)

Holi 2019: वसंत ऋतूच्या आगमानाची चाहूल म्हणजे होळीचा सण. होलिका दहन (Holika Dahan) ,धूळवड (Dhulvad)आणि रंगपचमी (Rang Panchami) अशा तीन दिवसांमध्ये होळीचा सण रंगतो. यंदा होलिका दहन 20 मार्च दिवशी संध्याकाळी आहे. या दिवशी सकाळी 10.45 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमेला सुरूवात होत आहे. ही पौर्णिमा दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे महराष्ट्रात 20 मार्चच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर होळी पेटवली जाईल. गुरूवार (21 मार्च) हा दिवस धूळवड म्हणून साजरा केला जाणार आहे. Happy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

कशी साजरी केली जाते होळी

महाराष्ट्रासह देशभरामध्ये होळी हा सण विविध नावाने ओळखला जातो. कोकणात होळीपासून पुढील 8-15 दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. ही एक प्रकारची अग्निपूजाच आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना झाडांची छाटणी करण्यापेक्षा पानगळ झालेली पानं, काट्या कुट्या एकत्र करून होळी साजरी करणं हितावह आहे. होळीची शास्त्रोत्र पूजा करून ती पेटवली जाते. त्याभोवती फिरून बोंबा मारल्या जातात. Shimga Festival 2019: कोकणातील होळी सण, पालखी नाचवणं, दशावतार यांनी आठवडाभर रंगतो शिमगोत्सव!

होळी दहन 20 मार्चच्या रात्री यंदा एक तास 7 मिनिटांच्या काळात करणं हितावह आहे. रात्री 11.28 ते 12.35 या काळात साजरी केली जाईल.

होळी सणाच्या पौराणिक कथा

  • भगवान श्रीकृष्ण लहान असतांना त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठवले. ती विषारी दूध पाजीत असतानाच तिचा प्राण शोषून कृष्णाने दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. या पूतना राक्षसीला होळीच्या दिवशी रात्रीच्यावेळी जाळण्यात येते.
  • भविष्यपुराणातील गोष्टीप्रमाणे पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावातील मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.

बोंबा का मारल्या जातात?

फाल्गुन हा शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यानंतर नववर्षाची सुरूवात होते. होलिका दहनाच्या दिवशी ढुंढा राक्षसीला म्हणजे अस्वच्छतेला शिव्या दिल्या जातात. मनातील विकृत भावनांचा निचरा केला जातो. त्यामुळे बोंबा मारल्या जातात. आपल्या सण आणि संस्कृतीमध्येच काही छुपे गूढ अर्थ लपले आहेत. त्यामुळे काही बिभत्स कृत्य करण्यापेक्षा त्याचा अर्थ आणि त्यामागील संकल्पना जाणून सण साजरा केल्यास तो अधिक आनंददायी ठरेल.

होळीनंतर दुसरा दिवस धूळवड किंवा धुलिवंदनाचा असतो. यादिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे.