कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे अनेक सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम रद्द केले गेले. आता याचा परिणाम हज यात्रा 2020 (Hajj Yatra 2020) वरही होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने पुढील परिस्थितीबद्दल माहिती दिल्यानंतर या यात्रेबाबत अंतिम निर्णय होणार आहे. अशात यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला (Hajj Committee of India) ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने सांगितले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसूद अहमद खान (Masood Ahmed Khan) यांनी सांगितले की, केंद्रीय हज कमिटीने हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.
खान पुढे म्हणाले की, ‘या यात्रेच्या तयारीला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत आणि आतापर्यंत सौदी अरेबियातील हज यात्रेबाबत अधिकाऱ्यांशी कोणताही संवाद झाला नाही. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रेसाठी निवडलेल्या लोकांना परिपत्रकाद्वारे सांगितले आहे की, ज्यांना हजला जाण्याची इच्छा नाही ते आपले पैसे परत घेऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्येही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे यंदाची यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे.
यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा आहे. दरवर्षी याची तयारी फार आधीपासून सुरु केली जाते. पण यंदा आता तयारीसाठी अत्यल्प वेळ राहिलेला असताना अद्यापही सौदी प्रशासनाकडून पुढील सूचना मिळालेली नाही. त्यामुळे ज्या लोकांना आपली हज यात्रा रद्द करायची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर दिलेला यात्रा रद्दीकरणाचा फॉर्म भरुन, तो ceo.hajcommittee@nic.in या ई-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबूक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय पवित्र आहे हज यात्रा; जाणून घ्या याचे महत्व आणि यात्रेदरम्यान केले जाणारे विधी)
दरम्यान, यावर्षी आंतरराष्ट्रीय विमानांवरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे हज यात्रेची शक्यताही कमी आहे. भारत ते सौदी अरेबिया हजसाठीची विमाने 25 जूनपासून सुरू होणार असून, 40 दिवसांचा प्रवास 2 ऑगस्टला संपेल. दरवर्षी सरासरी दोन लाख मुस्लिम हज यात्रेवर जातात. 70 टक्के यात्रेकरू हज समितीमार्फत प्रवास करतात, तर 30 टक्के खासगी टूर ऑपरेटरला पसंती देतात.