Gudi Padwa Shobha Yatra (Photo Credits: Flickr, Wikimedia Commons)

‘गुढीपाडवा’ (Gudi Padwa) हा महाराष्ट्रीयन लोकांसाठी नवीन वर्षाचा शुभारंभ आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. यंदा गुढीपाडवा शनिवार, 2 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हा सण महाराष्ट्र, गोवा आणि दमणमध्ये काही भागात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या आधी अनेक दिवस नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. घराची साफसफाई केली जाते, घर तोरण आणि रांगोळ्यांनी सजवले जाते. या दिवशी गुडीला खास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो.

गुडीपाडव्याला संपूर्ण राज्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडते. विशेषत: मुंबईकर हा सण मोठ्या धूम-धडाक्यात साजरा करतात. गुडीपाडवा म्हणजे शोभायात्रा (Shobha Yatra 2022) हे समीकरण अनेक वर्षांपासून शहरात रुजत असल्याचे दिसते. शोभायात्रेत मराठमोळी पारंपारिक वेशभूषा करून मराठी खेळ यात केले जातात, तर काही ठिकाणी आजकाल रथ तयार करून त्यात विविध दृश्ये दाखविली जातात. काही ठिकाणी महिला नऊवारी साड्या नेसून, फेटे बांधून, नथ घालून बुलेट गाडीवरून राऊंड मारताना दिसतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शोभा यात्रेला बंदी होती. मात्र आता मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा शोभा यात्रेची धूम पहायला मिळणार आहे.

आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील कोरोना (Corona) निर्बंध पूर्णत: हटवत, यंदाच्या गुढीपाडव्याला 'निर्बंधमुक्त गुढी' उभारण्याची भेट सरकारने जनतेला दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. पाडव्याची शोभा यात्रा, बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक आणि रमजान ईद दणक्यात साजरी करा, असे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटले आहे. आता राज्यात मास्क घालणेसुद्धा ऐच्छिक असणार आहे. (हेही वाचा: 'एप्रिल फुल डे'च्या निमित्ताने खास Wishes, Images, Funny Jokes पाठवून मित्रांना द्या मजेशीर शुभेच्छा)

त्यामुळे आता 2 वर्षानंतर शोभा यात्रा निघणार आहे. ही मिरवणूक मुंबईतील गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्वाचे आकर्षण असते. शोभा यात्रा सकाळी साधारण 8 वाजता सुरू होऊन दुपारपर्यंत चालते. रॅली पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक येतात.