भारताचा स्वातंत्र्यदिन २०१९ (Photo Credits: Google)

भारताचा स्वातंत्र्यदिन २०१९: आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. हाच तो दिवस जेव्हा भारत 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगीरीतून मुक्त झाला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी स्वतंत्र देशाची नवी पहाट पहिली होती. यंदा आपण आपला 73 वा स्वातंत्र्य दिन (73rd Independence Day) साजरा करत आहे. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीय एखादा सणाप्रमाणे साजरा करेल. गुगलनेदेखील एका खास गुगल डूडलच्या (Google Doodle) माध्यमातून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज आपण जो हा स्वातंत्र्याचा वारा अनुभवत आहोत तो इतक्या सोप्या रीतीने मिळाला नाही. यामागे अनेक सैनिक, क्रांतीकारक, मोठे नेते, असंख्य नागरिक यांची आहुती आहे. या बलिदानामुळेच आज प्रत्येक भारतीय ही स्वातंत्र्याची चव चाखू शकत आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. हाच अभिमान गुगलच्या माध्यमातूनही दिसत आहे. गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून भारताच्या झेंड्याच्या रंगात (तिरंगी) भारतीय संस्कृतीचे आणि ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

(हेही वाचा: Independence Day 2019 Quotes: स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे महत्त्वपूर्ण कोट्स)

दरम्यान, काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती यांनी भारतीय जनतेला उद्देशून भाषण केले. राष्ट्रपतींच्या भाषणात सरकारचे धोरण, सरकारने केलेले काम, देशाची मुल्ये आणि भविष्याबद्दलच्या योजनांचा घोषवारा होता. देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन आपला राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिनी फडकवतात. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, संस्कृती यांचे प्रदर्शन केले जाते. ज्यामुळे देशवासीयांना आपल्या क्षमतेचा अभिमान वाटेल आणि शत्रूंना धडकी भरेन. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. परंतू, त्याशिवाय इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.