Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत अनेकजण सोनं खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. सोनं खरेदीचा हा उत्साह यंदा अधिक दिसून आला. कारण यंदा अक्षय्य तृतीयेनिमित्त देशभरात तीन वर्षातील सर्वाधिक सोनं विक्री झाली. यंदा देशभरात सोने विक्रीत 25% वाढ झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे सोन्याच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र यंदाची अक्षय्य तृतीया सोने व्यापारांसाठी खास ठरली. सोने विक्रीत झालेल्या वाढीला सोन्याचा कमी झालेला दरही कारणीभूत ठरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा दर 7% कमी झाला आहे. (अक्षय्य तृतीया दिवशी जाणून घ्या काय होते सोन्याचे दर)
सोने खरेदीसाठी सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची एकच झुंबड उडाली होती. यंदा सोन्याचे नाणे आणि दागिने खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. देशभरात दक्षिणेकडे सोनेविक्री सर्वाधिक झाली असून त्यानंतर उत्तर भारताचा नंबर लागतो. (अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं)
भविष्यातील तरतूद म्हणून ग्राहकांचा सोन्याचं वळं खरेदी करण्यावर अधिक भर असतो. मात्र यंदा पुण्यात ग्राहकांनी वळ खरेदी ऐवजी दागिने खरेदी करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे वळं खरेदी 10-20% कमी झाली आहे. पुण्यानंतर नाशिक, जळगाव येथे ही सोन्याच्या दागिन्यांची चांगलीच विक्री झाली.