
Jyeshtha Gauri Pujan 2023 Images: नुकतेच 19 सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन झाले व त्यानंतर वेध लागले होते ते गौराईचे. आता उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर, गुरुवारी जेष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gauri Pujan 2023) आहे. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईची पूजा करून तिला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन होते.
हिंदू धर्मात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीची पूजा करतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या रितीरिवाजाप्रमाणे गौरी बसविल्या जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी खड्यांची पूजा केली जाते. अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी, समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो.
तर या मंगलमय प्रसंगी तुम्ही खास Wishes, Images, Messages, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा देऊ शकता.





दरम्यान, पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाने त्रस्त झालेल्या पृथ्वीवरील महिलांनी त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध केला. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: आता घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमिंग)
गौरी ही माहेरवाशीण म्हणून घरी येते. त्यामुळे वाजतगाजत, दारात रांगोळी काढून तिचे स्वागत केले जाते. संपूर्ण घरात लक्ष्मीची पावले काढून तिला घरातील सर्व जागा दाखविल्या जातात. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना केली जाते. नंतर मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळी व तिसऱ्या दिवशी गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवून तिचे विसर्जन होते.