Shri Krishna Aarti: आज देशभरात जन्माष्टमी साजरी होत आहे. हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा सण खूप खास आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. अनेक लोक जन्माष्टमीचे व्रत ठेवतात आणि नियमानुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात. जन्माष्टमी पूजेदरम्यान एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाची आरती. तुम्ही पुजेच्यावेळी खालील आरती गाऊन जन्माष्टमी साजरी करू शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami Special Recipes: गोपाळकाला ते गोविंद लाडू पहा कृष्ण जन्माष्टमी निमित्त खास नैवेद्याचे पदार्थ)
श्रीकृष्णाची आरती -
जय जय कृष्णनाथा ।तिन्ही लोकींच्या ताता । आरती ओवाळीता। हरली घोर भवचिंता ।।धृ.।।धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला । धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला। धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला । धन्य ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा ।। १ ।। धन्य ती नंदयशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला । धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला। धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा । धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता ।।२।।
श्रीकृष्ण पाळणा -
बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥ जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी । पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥ बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी । जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥ मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा । शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥ रत्नजडित पालख । झळके आमोलिक । वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥ हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥ विश्वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया । तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर । कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक । प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा । शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥ उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण । यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥ गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला । दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥ इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन । गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥ कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास । खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥ ऐशी चरित्रे अपार । दावील भूमीवर । पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥
वरील आरती आणि पाळणा गाऊन तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करू शकता. याशिवाय तुम्ही श्रीकृष्णाची आरती तुम्ही मित्रपरिवारास पाठवू शकता.