Christmas 2018: Secret Santa ची सुरुवात कोणी केली ? काय आहे या परंपरेचे मूळ आणि इतिहास?
Secret Santa tradition (Photo credits: Pixabay)

डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा काहीसा आनंदी, आल्हाददायी असतो. ख्रिसमस, न्यू ईअर सेलिब्रेशन, सुट्ट्या यांची धमाल असते. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी अनेकजण बाहेरगावी जाण्याचे प्लॅन्स करतात. पण जर तुम्ही कुठे जाणार नसाल तर तर ऑफिसमधल्या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये धमाल करु शकता. आजकाल अनेक ऑफिसेसमध्ये सिक्रेट सँटा (Secret Santa) हा गेम खेळला जातो. लोकांनी एकत्र येणे, एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद शेअर करणे हाच यामागचा हेतू असतो. Christmas, New Year Party चा आनंद घेऊनही हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स!

आपण सगळेच हा खेळ अगदी उत्साहात खेळतो. एकूण काय तर धमाल करतो. पण सिक्रेट सँटाचा इतिहास काय आहे आणि हा खेळ कोणी सुरु केला तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया...

सिक्रेट सँटाचे मूळ

सिक्रेट सँटाची संकल्पना म्हणजे अनामिक भेटवस्तू देणे. स्कँडिनेव्हिया (Scandinavia) येथे या संकल्पनेचे मूळ आहे. याला ज्यूलक्लॅप (Julklapp) असे म्हणतात. या शब्दाची फोड केल्यास "Jul" म्हणजे 'ख्रिसमस' (Christmas) आणि "Klapp" म्हणजे 'ठोठावणे' (to knock). याचाच अर्थ दरवाजा कोणीतरी ठोठावतं आणि गिफ्ट देऊन निघून जातं. अगदी कोणाच्याही नकळत. ही कल्पना कन्च रूपर्ट (Knecht Rupert) यांची होती. ते सँटाला घरोघरी जावून गिफ्ट देण्यास मदत करत असतं. हे गिफ्ट आपल्याला कोणी दिलंय याची हिंट त्यावर लिहिलेल्या छोट्याशा गंमतीशीर मेसेजमध्ये असे. ही गंमतीशीर संकल्पना पुढे वाढत गेली आणि परंपराच झाली. यात गिफ्ट मिळण्याची उत्सुकता आणि आनंद दडलेला आहे. त्याचबरोबर गिफ्ट घेण्यात जितका आनंद आहे तितकाच तो देण्यातही आहे हा छुपा संदेश यामागे आहे.

पहिला सिक्रेट सँटा कोण होता?

पहिल्या सिक्रेट सँटाची तर खास गोष्ट आहे. लॅरी डीन स्टीवर्ट (Larry Dean Stewart) हा अमेरिकन शुभचिंतक होता. तो कॅन्सस शहराचा (Kansas City) सिक्रेट सँटा म्हणून ओळखला जायचा. त्याने गरीब, दुबळ्यांना लहान लहान गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली आणि प्रेम, दयाभाव याचा प्रचार करु लागला. हे सर्व कोणालाही कळू न देता गुप्तपणे करण्याकडे स्टीवर्टचा कल होता आणि त्यात तो यशस्वीही झाला. कोणालाही कळलं नसे की ही गिफ्ट्स कोणी दिली आहेत ते. पण मीडियाच्या नजरेतून तो सुटला नाही. मात्र 2006 मध्ये जेव्हा त्याला oesophagal cancer झाल्याचे निदान झाले तेव्हा त्याची ओळख जगासमोर आली. स्टीवर्टचा दयाभाव फक्त कॅन्सस शहरापर्यंतच नाही तर संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये पसरला. या सिक्रेट सँटाचा 2007 मध्ये अंत झाला.

स्टीवर्टच्या दयाभावाचे प्रतिक म्हणून सिक्रेट सँटा हा खेळ सर्वत्र खेळला जातो. आपण हा खेळ जितका एन्जॉय करतो. त्यावरुन प्रेम, दयाभाव याला कसलेच बंधन नसते, हे अधोरेखित होते.