चैत्र महिन्याची सुरूवातच चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratri) मंगलमय पर्वाने होते. भारतामध्ये या नवरात्रीला काही ठिकाणी वसंत नवरात्री (Vasant Navratri) म्हणून देखील ओळखलं जातं. निसर्गामध्ये या काळात ऋतूमानानुसार बदल होत वसंत ऋतू बहरत असतो. मराठी नववर्षाची सुरूवात म्हणून या दिवशी गुढी पाडवा (Gudi Padwa) देखील साजरा केला जातो. ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार चैत्र नवरात्र/ पाडवा हा एप्रिल किंवा मार्च महिन्यात येतो. मग यंदा चैत्र नवरात्र नेमकी कधी सुरू होणार? त्यामधील महत्त्वाचे दिवस कधी आणि कोणते हे सारं इथे घ्या जाणून.
शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्येही दुर्गा मातेची नऊ रूपं नऊ दिवशी पुजण्याची पद्धत आहे. दृष्टांवर मात करण्यासाठी आणि आनंद कायम रहावा म्हणून दुर्गा मातेचं पूजन करण्याची पद्धत आहे. यंदा चैत्र नवरात्र 2 एप्रिल ते 11 एप्रिल असणार आहे. यामध्ये अष्टमी 9 एप्रिल दिवशी अष्टमी साजरी केली जाणार आहे.
घटस्थापनेची वेळ
चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त शनिवार, 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 06:22 ते 08:31 पर्यंत असेल. एकूण कालावधी 02 तास आणि 09 मिनिटे असेल. याशिवाय घटस्थापनेवरील अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 8 मिनिटं ते 12 वाजून 57 मिनिटं पर्यंत असेल.
महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे काही जण घटस्थापना करतात. तर काही महिला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे देखील कार्यक्रम करतात. यानिमित्ताने कैरीचं पन्हं आणि आंबेडाळीचा बेत केला जातो. चैत्र नवरात्रीमध्ये देखील पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे.
(टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली त्यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.)