Gold Purity Guide: अक्षय्य तृतीया दिवशी Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक
Gold, Silver (Photo Credits: Instagram)

Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तामधील एक दिवस यंदा 7 मे 2019 दिवशी आहे. यादिवशी दिलेले दान अक्षय्य म्हणजेच चिरंतन राहते. अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचं एक महत्त्व म्हणजे या दिवशी लक्ष्मी (Laxmi) आणि विष्णूची (Vishnu) पूजा केली जाते.प्रतिकात्मक स्वरूपात लक्ष्मीला घरी आणण्यासाठी सोनं(Gold) विकत घेतलं जातं. काही जण हौस म्हणून तर काही गुंतवणूक  म्हणून सोनं खरेदी करतात. पण सर्वात मौल्यवान समजल्या जाणार्‍या या धातूच्या खरेदी दरम्यान तुमची फसगत होऊ नये म्हणून काही गोष्टी सोनं खरेदीपूर्वीच जाणून घ्या. Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

24k, 22k आणि 18k स्वरूपात सोनं

सोन्याच्या बाजारात किंवा सराफाच्या दुकानात सोनं हे विविध स्वरूपात उपलब्ध असतं. 24k, 22k आणि 18k कॅरेट मध्ये त्याची शुद्धता तपासली जाते. तुम्ही सोनं का घेताय? यावर तुम्ही ते कोणत्या स्वरूपात घ्यायला पाहिजे हे ठरतं. 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध आणि महाग असतं. त्या खालोखाल 23कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोनं उपलब्ध असतं. Akshaya Tritiya 2019: यंदा 16 वर्षानंतर येणार अद्भुत योग, अक्षय्य तृतीया ठरणार तुमच्यासाठी लाभदायक

24k, 22k आणि 18k सोनं आणि ते कशासाठी विकत घेणं अधिक सोयस्कर?

  • 24 कॅरेट सोनं 

24 कॅरेट सोनं हे अस्सल शुद्ध सोनं असतं. यामध्ये 24/24 फक्त सोनं असतं. पिवळ्या धम्मक रंगाचं चकाकणारं सोनं त्याची शुद्धता दर्शवते. वजनाला हलकं असणारं हे सोनं प्रामुख्याने सोन्याची कॉईन्स, बिस्किटं यामध्ये वापरली जातात. त्यामुळे गुंतवणूकीच्या उद्देशाने सोनं विकत घेत असाल तर 24 कॅरेट सोनं घ्या. 24 कॅरेट सोन्यामध्ये नेहमीच्या वापरातले दागिने बनवता येत नाहीत.

  • 23 कॅरेट सोनं  

23 कॅरेटमध्ये  काही दागिने बनवता येऊ शकतात. मात्र प्रामुख्याने वळं, कॉईन्स 23 कॅरेट सोन्यामध्ये उपलब्ध असतात. 23 कॅरेट सोन्यात बनवलेले जाणारे दागिने नेहमीच्या वापरातील नसतात.

  • 22 कॅरेट सोनं

तुम्हांला सोन्याच्या दागिन्याची खरेदी करायची असेल तर ते दागिने प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्यात बनवलेले असतात. यामध्ये 24 पैकी 22 भाग सोन्याचे असतात.म्हणजे  91.67 % शुद्ध सोनं वापरलेले असते. इतर अन्य धातुंनी बनलेले असते. यामध्ये चांदी, झिंक,तांबं अशा अन्य धातूंचा समावेश केलेला असतो. यामुळे सोन्याचे दागिने मजबूत बनतात.खास नक्षीकाम, हिर्‍यांचे दागिने 22 कॅरेटमध्ये बनवले जातात.

  • 18 कॅरेट सोनं

75% सोनं आणि इतर 25% अन्य धातूंच्या मिश्रणाने 18 कॅरेट सोनं बनतं.यामध्ये तांबं, चांदी यांचा समावेश केलेला असतो. हिरे किंवा अन्य रत्नजडीत दागिन्यांसाठी 18 कॅरेट सोनं वापरलं जातं. इतर सोन्याच्या तुलनेत ते स्वस्त असतं. 18K सोन्यावर 750, 0.75 असा स्टॅम्प तुम्हांला दिसेल. यामुळे त्या दागिन्यांमध्ये 75% सोनं असल्याची माहिती दिली जाते.

रंगावरून सोन्याची पारख

  • पिवळं धम्मक सोनं - 24 कॅरेट सोनं हे पिवळं धम्मक असतं.
  • हलकं गुलाबी सोनं - सोन्यात कॉपर म्हणजे तांबं मिसळल्यास दागिने हलक्या गुलाबी -सोनेरी रंगाचे दिसतात.
  • हिरवट सोनेरी सोनं - जेव्हा सोन्यात चांदी किंवा झिंक अधिक प्रमाणात मिसळलं असेल तेव्हा ते हिरवट सोनेरी रंगाचे दिसतात.
  • पांढरट सोनं- सोन्यात निकेल किंवा पॅलेडियम असल्यास ते पांढरट रंगाचं दिसतं.

सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि  पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या. तसेच दागिने विकत घेतानाच भविष्यात त्यामध्ये बदल करायचे झाल्यास,विकायचे असल्यास काय करता येईल हे विचारून योग्य सोन्याची निवड करा म्हणजे फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळता येईल.