Bail Pola 2023 श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणून ओळखला जाणार बैल पोळा हा कृषीप्रधान भारतातील एक उत्सवच. शेतामध्ये काबाडकष्ट करुन अनेकांचे पोट भरणाऱ्या आणि मानवी अन्नसाखळी मजबूत करणाऱ्या बळीराजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. शेती कसताना सावलीसारखे सोबती असलेल्या बैलांप्रति आदर आण सन्मान दाखविण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये बैल हा केंद्रस्थानी असतो. त्यासोबतच शेती आणि इतर अवजारांचीही विशेष पुजा केली जाते. जाणून घ्या यंदाच्या वर्षी कधी आहे बैल पोळा?
कधी आहे बैल पोळा?
यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये बैल पोळा हा गुरुवारी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी येतो आहे. हिंदू पंचागांनुसार 14 तारखेपासून पहाटे 4.50 मिनीटांनी श्रावण अमावस्या सुरु होत आहे. जी शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.15 वाजता संपेल. या दरम्यानच बैल पोळा येतो आहे.
बैलपोला विविधता आणि वेगळेपण
बैलपोळा साजरा करण्यासाठी प्रदेशपरत्वे विविधता आणि वेगळेपणही पाहायला मिळते. जसे की, काही भागात हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा होतो. महाराष्ट्रातही हा सण अशाच पद्धतीने साजरा होतो. अर्थात परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा अनेकदा भिन्न असतात.त्यामुळे भारतीय सण आणि उत्सवांमध्ये नेहमीच विविधता आढळते. तसेच हे सण साजरे करताना त्यात विविधताही आढळते.
बैलपूजा
शेतकरी वर्गात बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण आहे. ज्यामध्ये बैलांप्रती विशेष कृतज्ञता दर्शवली जाते. त्यांना एक दिवस औतापासून विश्रांती दिली जाते. त्यांना हिरवा चारा घातला जातो. इतकेच नव्हे तर त्यांना अंघोळ घालून त्यांची हळदी कुंकवाने पूजा केली जाते. त्यांना गोडाधोडाचा नैव्यद्यही चारला जातो. शिवाय त्यांचे खांदे तेलाने, तूपाने मळले जातात. त्यांच्या अंगावर छान झूल, गळ्यात चाळ आणि शिंगांना शेंब्या घातल्या जातात. गळ्यात कवड्यांची माळ, कंडा, म्होरकी घातली जाते. इतकेच नव्हे तर नवी वेसण, कासरेही नवे घेतले जातात. हा दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस मानला जातो.