Ayodhya Deepotsav 2021 (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिवाळीच्या (Diwali 2021) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील (UP) अयोध्येत (Ayodhya) भव्य दीपोत्सव (Deepotsav) कार्यक्रम पार पडला. यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. आज अयोध्येत 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती, हा एक जागतिक विक्रम आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री अयोध्येत उपस्थित होते. तत्पूर्वी शहरातील साकेत पीजी कॉलेज येथून जय श्री रामचा जयघोष आणि शंखांच्या गजरात राम राज्याभिषेक मिरवणूक निघाली. ज्यामध्ये भारतातील लोकसंस्कृतीचे विविध रंग पाहायला मिळाले.

आज केवळ 'राम की पैड़ी' येथे 9 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. आजच्या या दिपोत्सावानंतर अयोध्येचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. यूपीचा पर्यटन विभाग आणि डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाने संयुक्तपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. दोघांनी मिळून अयोध्या दीपोत्सव 2021 मध्ये जास्तीत जास्त दिवे प्रज्वलित केले. आज आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम अयोध्येत पोहोचली होती.

आज अयोध्येत 32 टीम्सनी मिळून 12 लाख दिवे प्रज्वलित केले. यामध्ये सुमारे 36 हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात आले. दिव्यांची मोजणी गिनीज वर्ल्ड टीमद्वारे केली गेली. वर्ल्ड रेकॉर्ड टीमने मंचावर सांगितले की 9 लाखाहून अधिक दिव्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. विश्वविक्रम करण्यासाठी सुमारे 5 मिनिटे एक मातीचा दिवा जळणे आवश्यक मानले जाते. जेव्हा 2017 मध्ये यूपीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री योगी यांचे सरकार बनले होते, तेव्हा दीपोत्सव कार्यक्रमाच्या प्रारंभी 1 लाख 80 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. (हेही वाचा: दिवाळी अथवा इतर वेळी BIS-नोंदणीकृत ज्वेलर्सकडून केवळ हॉलमार्क दागिनेच खरेदी करा; सरकारचा आग्रह)

2018 मध्ये 3 लाख 1 हजार 152 दिवे प्रज्वलित करण्यात आले. 2019 मध्ये 5 लाख 50 हजार आणि 2020 मध्ये 5 लाख 51 हजार दिव्यांनी अयोध्या उजळून निघाली होती. यंदाचे चित्र वेगळे आहे. अयोध्येने यंदाच्या पाचव्या भव्य दीपोत्सवात 12 लाख दिव्यांची रोषणाई करून विश्वविक्रम केला आहे.