Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीला 400 वारकऱ्यांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन; उद्या होणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
Shree Vitthal (Phot o Credits-YouTube)

मंगळवार, 20 जुलै रोजी आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2021) उत्सव साजरा होणार आहे. देशावर अजूनही कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने यंदाही पायी वारीची परवानगी नाकारल्याने, प्रतिकात्मक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर तयारीच्या अनुषंगाने आज पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. यामध्ये मानाच्या 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मिळणार असल्याचा निर्णय घेतला गेला. कोरोनाच्या वाढत्या संकटामध्ये आषाढी वारीसाठी राज्यातील दहा सर्वात महत्वाच्या पालखींनाच परवानगी देण्यात आली आहे.

या पालख्यांना व त्यांच्यासोबतच्या वारकऱ्यांना बसमधून प्रवास करण्याची परवानगी शासनाने दिली असून, त्यासाठी 20 बसेसची सोय करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीदिवशी भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद असणार आहे, त्यावेळी फक्त 10 पालख्या व त्यांच्यासोबत असणाऱ्या 400 वारकऱ्यांना दर्शनाची मुभा असेल.

परवानगी मिळालेल्या पालख्या -

  • संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
  • संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
  • संत सोपान काका महाराज (सासवड)
  • संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
  • संत तुकाराम महाराज (देहू)
  • संत नामदेव महाराज (पंढरपूर)
  • संत एकनाथ महाराज (पैठण)
  • रुक्मिणी माता (कौडनेपूर-अमरावती)
  • संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
  • संत चंगतेश्वर महाराज (सासवड)

सरकारने परवानगी दिलेल्या या 10 पालख्या एकादशी ते पौर्णिमा या काळात पंढरपूरमध्ये असणार आहेत. हा संपूर्ण उत्सव कोरोना विषाणू संसर्गाबाबतच्या निर्बंधाचे पालन करून पार पडणार आहे. या काळात बाहेरुन आलेल्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. (हेही वाचा: यंदाही रद्द झाली 'अमरनाथ यात्रा'; जाणून घ्या कुठे व कधी पाहू शकाल आरतीचे थेट प्रक्षेपण)

दरम्यान, उद्या 1 जुलै 2021 रोजी देहू येथे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान होणार सोहळा होणार आहे. परवा आळंदी येथून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. हे सोहळे प्रतीकात्मकरीत्या होतील. त्यांनतर पादुका मंदिरातच विसावतील, आषाढीच्या आधी त्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होतील.