Ashadhi Ekadashi 2020: पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात; विठ्ठल रूक्मिणी मंदिर सजावट ते संचारबंदी नियम कोरोना संकटात असा असेल आषाढीचा सोहळा
Pandharpur Ashadhi Ekadashi 2020| Photo Credits: Twitter/ PandharpurVR

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रूक्मिणीच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी दरवर्षी वारकरी पायी वारी करत पंढरपुरात (Pandharpur)  दाखल होतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) सोहळ्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. वारकर्‍यांसह विठू माऊलीच्या सार्‍याच भक्तांना यंदा घरी हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र प्रातिनिधिक स्वरूपात यंदा आषाढी एकादशी 2020,  1  जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त काटेकोर नियमांमध्ये पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यांत आली आहे. विठूरायाच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर दशमीला म्हणजे उद्या (30 जून) संत तुकाराम आणि ज्ञानोबांच्या पादुका पंढरपुरात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यंदा विठूरायाची सपत्निक शासकीय महापूजा करणार आहेत. परंतू सामान्यांसाठी आजपासून 2 जुलै पर्यंत संचार बंदी लागू असेल. Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ

विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई

पंढरपुरामध्ये यंदा विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनाला आषाढी निमित्त वैष्णवांचा मेळा दाखल होणार नसला तरीही मंदिर प्रशासनाकडून या सणानिमित्त आकर्षक रोषणाई केली आहे.

पंढरपुरात संचारबंदी

यंदा आषाढी वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सामान्य भक्ताला मंदिरामध्ये विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेता येणार नाही. यापार्श्वभूमीवर आता 29 जून ते 2 जुलै या काळासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा त्रि स्तरीय वेढा शहराला आहे. केवळ पासधारक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ये-जा करू शकतात. वारकऱ्यांनी आषाढीवारीकरिता पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी बनविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video

विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा 2020 

विठू माऊलीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाला आहे. ते सपत्निक या शासकीय पूजेत सहभाग घेणार आहेत. दरम्यान कोरोना संकटातून अवघ्य जगाची मुक्तता कर असं साकडं घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दशमीला पादुका येणार

दरम्यान यंदा पायी वारी रद्द झाल्याने उद्या (30 जून) दिवशी एसटीच्या माधयमातून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका निवडक वारकर्‍यांसह एस टी बसने पंढरपुरात दाखल होणार आहेत तर द्वादशीला पुन्हा घेऊन जाणार आहेत.

पंढरपुराप्रमाणेच महाराष्ट्रातही इतर विठ्ठल रूक्मिणीची मंदिरं बंद ठेवली जाणार आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून पूजा दाखवली जाईल. विठूरायाच्या भक्तांना कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता घरच्या घरीच हा खास सोहळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. भगवान विष्णू आजपासून 4 महिने निद्रावस्थेमध्ये राहतात. तर देवउठनी एकादशीला जागे होतात.