Gadge Maharaj Jayanti 2021 Quotes: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj jayanti) यांची आज जयंती आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत. तर, जाणून घेऊया संत गाडगेबाबा यांचे 10 अमूल्य विचार. हे देखील वाचा- Jaya Ekadashi 2021: जया एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व
संत गाडगेबाबा यांचे 10 अमूल्य विचार-
- भुकेलेल्यांना खायला अन्न द्या.
- तहानलेल्यांना पाणी द्या.
- वस्त्रहीन लोकांना कपडे द्या.
- गरीब मुलांच्या शिक्षणास मदत करा, त्यांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी योगदान द्या.
- बेघर लोकांना आश्रय द्या.
- अंध, अपंग, आजारी लोकांना मदत करा.
- बरोजगारांना रोजगार द्या.
- पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या.
- गरिब आणि कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्न कार्यात मदत करा.
- दु:खी आणि निराश लोकांना प्रोत्साहित करा.
गाडगे महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.