Anganewadi Jatra 2020: आज पहाटे 3 वाजल्यापासून आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात; दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार दर्शन
Anganewadi Jatra 2020 (संग्रहित संपादित प्रतिमा)

नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या, आंगणेवाडीच्या (Anganewadi) भराडी देवीची (Bharadi Devi) जत्रा, आज, 17 फ्रेब्रुवारी पासून सुरु होत आहे. मालवणपासून 15 कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज आहे. कोकणासह महाराष्ट्रातील महत्वाच्या जत्रेपैकी ही एक जत्रा मानली जाते.

ही जत्रा साधारण फेब्रुवारी-मार्च मध्ये भरली जाते. महत्वाचे म्हणजे या जत्रेची तिथी निश्चित करण्यासाठी गावकरी आधी शिकार करतात, त्यानंतर एकत्र बसून  कौल लावून या जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. यंदा सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

या जत्रेसाठी साधारण 8 लाख भाविक देवीच्या दर्शनाला येतात. यावर्षीही अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे, यासाठी संपूर्ण आंगणेवाडी सज्ज झाली आहे. देवीचे मंदिर फुलांनी व विद्युतरोषणाईने सजवले आहे. गर्दीचे नियोजन योग्यरीतीने व्हावे यासाठी भाविक 9 रांगांच्या माध्यमातून देवीचे दर्शन घेऊ शकतात. जत्रेसाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने, संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. यात्रेनिमित्त मुंबई-पुण्यामधील चाकरमानी आपापल्या घरी पोहचली आहेत.

असा असेल कार्यक्रम -

भराडी देवीच्या दर्शनाला 17 फेब्रुवारी, पहाटे तीनपासून सुरुवात होईल. नंतर रात्री 9 ते 1 या चार तासांत आंगणे कुटुंबियांचे मंदिरात धार्मिक विधी होतील. मध्यरात्री एकनंतर दर्शन, ओटी भरणे आदी कार्यक्रम पूर्ववत सुरू होतील.

खास आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहू यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी तीन स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मालवण, कणकवली, मसुरे स्टॅन्डवरून अविरत एसटी सेवा सुरळीत राहणार असून, दुसऱया दिवशीही एसटी सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे. दिव्यांग बांधवांना मंदिरापर्यंत आणण्यासाठी तिन्ही बसस्थानकावरून प्रत्येकी दोन रिक्षा सोडल्या जातील.  यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेमध्ये सुमारे 40 सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये जवजवळ सर्व महत्वाची स्थाने कव्हर करण्यात येतील. तसेच भाविकांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध असतील.

या उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उद्या दुपारी भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा आंगणेवाडी दौरा सुमारे 40 मिनिटांचा असून, मसुरे स्टॅण्डच्या बाजूने मुख्यमंत्री हेलिपॅडवरून मंदिरामध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री प्रथम भराडी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते आंगणेवाडी मंडळ आणि आंगणे कुटुंबियांच्या सभामंडपातील स्टेजवरून आंगणे कुटुंबियांचा सत्कार स्वीकारतील. (हेही वाचा: Anganewadi Jatra 2020: आंगणेवाडी जत्रेवेळी दिव्यांगांना मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी रिक्षाची व्यवस्था)

आंगणेवाडी हे प्लास्टिकमुक्त आणि दारूमुक्त गाव आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी करताना आढळला तर त्यास योग्य ती शिक्षा केली जाणार आहे. तसेच देवीचा फोटो काढण्यावरही बंदी आहे. या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धारासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत वापरली जात नाही. देवीचा वरदहस्त लाभावा म्हणून अनेक भाविक, राजकीय पुढारी, उद्योजक, नेतेमंडळी यथाशक्ती सढळहस्ते मदत करतात. त्यातूनच दरवर्षी 1500 कार्यकर्ते राबून ही जत्रा सिद्धीस नेतात.