Anganewadi Jatra 2020: भराडी देवीचा गोंधळ ते ताट लावण्याची प्रथा आंगणेवाडी जत्रेमध्ये असते या 8 गोष्टींचं आकर्षण!
Anganewadi Bharadi Devi Jatra 2020 (Photo Credits: Instagram)

Anganewadi Bharadi Devi Jatra 2020: मालवणसह अनेक कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेली आंगणेवाडीतील (Anganewadi Jatra) भराडी देवीची जत्रा  यंदा 17 फेब्रुवारी दिवशी रंगणार आहे. या जत्रेला हजेरी लावण्यासाठी मुंबई, पुणे सह देशा-परदेशातून भाविक हमखास हजेरी लावतात. यंदादेखील कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेनिमित्त (Bharadi Devi Jatra) विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनासोबत एसटी महामंडळ आणि अन्य वाहतूक सेवादेखील वाढवण्यात आल्या आहेत. मग जगभरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीबद्दल तुम्हांला काही खास गोष्टी ठाऊक आहेत का?

आंगणेवाडीमधील भराडी देवीला केवळ सामान्य नागरिक नव्हे तर राज्यातील अनेक बडे नेते, कलाकार मंडळी हजेरी लावतात. त्यामुळे या दीड दिवसाच्या जत्रेमध्ये देवीचा गोंधळ, उपवास, नैवेद्य ते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही वेगळेपण दिसून येतं. पहा यंदा तुम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या जत्रेबद्दल या काही खास गोष्टी नक्की जाणून घ्या. Anganewadi Jatra 2020 Special Trains: यंदा 17 फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेला पोहचण्यासाठी मध्य रेल्वे चालवणार 4 विशेष गाड्या; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रा 2020 बद्दल काही खास गोष्टी

  • भराडी देवी ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील दैवत आहे. त्यामुळे या जत्रेमध्ये आंगणेवासियांना विशेष मान असतो. परंतू वर्षागणिक या जत्रेची वाढती लोकप्रियता पाहून देवीच्या दर्शनाला देशा-परदेशातून लोकं उपस्थित राहतात.
  • आंगणेवाडीतील भराडी देवी ही नवसाला पावणारी आहे अशी ख्याती असल्याने तिच्या जत्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये लाखो लोक उपस्थित राहतात तर कोट्यावधींची उलाढाल होते.
  • भराडी देवीच्या जत्रेच्या तारीख निवडीबद्दलही खास कुतुहल असतं. कारण ही तारीख कॅलेंडरनुसार नसून तर डुक्कराची शिकार करून देवीला कौल लावून तारखेची निवड केली जाते.
  • दीड दिवसाच्या आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी राखीव असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो. या दिवशी आंगणे गावातील माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात विशिष्ट प्रसाद करतात.
  • आंगणेवाडीच्या जत्रेदरम्यान गावातील प्रत्येक घरात प्रसादाची तयारी केली जाते तसेच जत्रेमध्ये आलेल्यांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते. यामध्ये भोपळ्याच्या वड्यांचा समावेश असतो. तसेच हा प्रसाद आंगणे गावातील माहेरवाशिणी अबोल राहून करतात.
  • देवीच्या नैवद्याचं ताट हिरव्या साडीत गाठोडं बनवून ठेवलं जातं. त्याची पूजा केली जाते. हे गाठोडं पूजेनंतर डोक्यावर घेऊन मुली मंदिरात जातात. त्यांना वाट दाखवण्यासाठी पेटती मशाल घेऊन गावकरी त्यांच्या मागे जातात. देवीच्या मंदिरात गाठोडं उघडून गार्‍हाणं म्हटलं जातं. काही प्रसाद आंगणेवाडीच्या घरात दिला जातो. हा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी असते कारण या प्रसादाला देवी स्पर्श करते अशी भाविकांची धारणा आहे.
  • देवीच्या दीड दिवसांच्या जत्रेमध्ये धार्मिक प्रथा-परंपरांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जाते. यामध्ये देवीचा गोंधळ खास मिरजेच्या गोंधळींकडून मांडला जातो तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं.

कोकणामध्ये आता पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तुम्हंला आंगणेवाडीच्या जत्रेनंतर जवळपास असणार्‍या काही पर्यटन केंद्रालाही भेट देता येऊ शकते. कोकणाला अथांग समुद्राचं वरदान लाभल्याने आता पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट्सदेखील सुरू करण्यात आले आहेत.