वैखाश महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya ) असे म्हणतात. यंदा हा दिवस 26 एप्रिल रोजी म्हणजे येत्या रविवारी असणार आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. या दिवशी ज्या गोष्टी केल्या जातील त्या सदैव तशाच म्हणजे अक्षय्य टिकून राहतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशीच्या तुमच्या वर्तणुकीबाबत खास विचार करावा. असं म्हणतात प्रत्येक सणाच्या मागे काही नियम असतात, या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबाबत हेच नियम आपल्याला माहिती देतात. तसेच काही सर्वसाधारण नियम हेअक्षय्य तृतीया दिवशी सुद्धा पाळले जातात. हे नियम अलिखित जरी असले तरी त्याचा संभाव्य फायदा लक्षात घेता तसे वागायला काहीच हरकत नाही हो, ना? चला तर मग जाणून घेऊयात यंदा अक्षय्य तृतीया दिवशी आपण काय केल्याने फायदा होईल आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत.
अक्षय्य तृतीया दिवशी हे नक्की करा.
लक्ष्मी-विष्णुची पूजा करा
समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक असणारे दांपत्य भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा या दिवशी एकत्र करायची असते. या दिवशी श्री लक्ष्मी सूक्त आणि विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे. लक्ष्मीचे आपल्या आयुष्यातील स्थान टिकवून ठेवायचे असेल तर ही पूजा महत्वाचे ठरते. या पूजेत तुळशीच्या पानाचा वापर करावा.
दान करा
अक्षय्य तृतीया दिवशी केलेल्या दानाचे विशेष महत्व आहे. यादिवशी गरिब आणि गरजूंना मदत केल्याने त्यांचे आशीर्वाद लाभतात आणि हे आशीर्वाद कायम टिकून राहतात. आपल्या ऐपतीप्रमाणे शक्य होईल तसे दान करावे. धान्य, कापड, किंवा जीवनावश्यक वस्तूंचे दान करावे. यंदा घराबाहेर न जाता दान करणे शक्य असेल तर ठीक अन्यथा काही दिवसांनी दान करू शकता.
काहीतरी नवीन खरेदी करा
अक्षय्य तृतीया दिवशी नवी वस्तू घेण्याची पद्धत आहे, शक्यतो सोने घेण्याची प्रथा वर्षानुवर्षे पाळली जाते. यंदा काही ज्वेलर्सनी ओनलाईन सोने विक्री सुरु केली आहे, घरात बसून खरेदी करण्यासाठी हा पर्याय तुम्ही निवडू शकता. तसेच, केंद्र सरकार व आरबीआयतर्फे ही सुरु करण्यात आली आहे यंदा प्रत्यक्ष सोन्याच्या ऐवजी बॉण्ड मध्ये आपण पैसे गुंतवू शकता.
अक्षय्य तृतीया दिवशी हे चुकूनही करू नका
क्रोध करु नका-
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणाबद्दल ही राग व्यक्त करु नये. ज्याच्या मनात क्रोध, मत्सर, दुःख अशा भावना प्रबळ असतात त्यांच्याकडे लक्ष्मी वसत नाही असे म्हणतात.
कोणालाही दुःख देऊ नका
असं म्हणतात एखाद्याला दुःखी केल्याने त्या समोरच्या व्यक्तीकडून अनावधाने आपल्या बाबत वाईट चिंतले जाऊ शकते हे नकारात्मक विचार सुद्धा आपल्यासोबत टिकून राहतात. तसेच कोणालाही त्रास दिल्याने, अत्याचार केल्याने आपल्या सभोवती सुद्धा नकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे अधिकाधिक वेळ हसतखेळत घालवा .
अक्षय्य तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, हिंदू धर्मात या सणाला खूप महत्व आहे. यंदा या सणाच्या दिवशी कोरोनामुळे लॉक डाऊन असणार आहे. तरी या वेळेचा वापर करून घरातील मंडळींसोबत घरातच वेळ घालवा. कुटुंबातील हे प्रेम सुद्धा अक्षय्य टिकून राहिल्यास तुम्हालाही आवडेल ना?
(टीप: वरील लेख हा माहितीच्या अनुषंगाने लिहिण्यात आला आहे. यामार्फत अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नाही.)