
कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढते प्रमाण त्यात लॉक डाऊनची अवस्था अशात अनेक कार्यक्रम, सोहळे, सार्वजनिक उत्सव रद्द केले गेले आहेत. आता राज्यातील भाविकांना चिंता आहे ती होऊ घातलेल्या आषाढी वारीची (Ashadhi Ekadashi Wari 2020). कोरोनाचे सावट आषाढी वारीवरही पडलेले दिसून येत आहे. कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकारी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या सदस्यांशी बैठक पार पडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. मात्र राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 29,100, आज दिवसभरात 1,576 नव्या रुग्णांची नोंद; 49 जणांचा मृत्यू)
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळ्याचे स्वरूप कशा प्रकारे करावे, याबाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी सांगितले. या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.