Mrs World 2022: भारताच्या Sargam Koushal यांनी जिंकला मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब; तब्बल 21 वर्षांनंतर भारतामध्ये परत आला मुकुट (Watch)
Sargam Koushal (Photo Credit: Instagram)

मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 ची विजेती बनल्यानंतर आता सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) मिसेस वर्ल्ड 2022 (Mrs World 2022) चा खिताबही जिंकला आहे. अशा प्रकारे तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापूर्वी अदिती गोवित्रीकर हिने हे विजेतेपद आणि मुकुट पटकावला होता. आता अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड 2022 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सरगमने भाग घेतला होता, जिथे तिला यंदाची मिसेस वर्ल्ड 2022 घोषित करण्यात आले.

तिच्या विजयाची बातमी शेअर करताना द ग्रेट पेजेंट कम्युनिटीच्या पेजने लिहिले की, 'भारताचा मोठा विजय आणि 21 वर्षांनंतर भारताने मिसेस वर्ल्ड स्पर्धा जिंकली! #MrsWorld 2022 चे विजेतेपद जिंकल्याबद्दल सरगम ​​आणि भारताचे अभिनंदन.' या स्पर्धेत मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप तर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले.

सरगम कौशल या पेशाने जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षिका आहेत आणि शिकवण्यासोबतच त्या मॉडेलिंगही करतात. सरगम या जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असून, 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पतीच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. 2022 मध्ये त्यांनी मिसेस इंडियाचा किताब पटकावला. (हेही वाचा: फुटबॉल सोबतच कतारने आयोजित केलाय 'उंट सौदर्य विश्वचषक', जाणून घ्या खास विशिष्ट्ये)

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सही ज्युरी म्हणून सहभागी झाले होते. ज्युरी पॅनेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन, प्रसिद्ध डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता.

माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर हिनेही या विजयाबद्दल सरगम ​​कौशलचे अभिनंदन करणारा खास संदेश पोस्ट केला आहे. अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने पोस्टमध्ये लिहिले, ‘अभिनंदन सरगम ​​आणि मिसेस इंडिया, मला या प्रवासाचा एक भाग बनून खूप आनंद होत आहे. 21 वर्षांनंतर हा मुकुट पुन्हा एकदा आपल्या देशात परतला आहे.’