Wendell Rodricks (Photo Credits: Twitter)

प्रसिद्ध फॅशन डिझायनर  (Fashion Designer), पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वेंडेल रॉड्रिक्स (Wendell Rodricks) यांचे निधन झाले आहे. एक फॅशन डिझायनर असल्याबरोबर वेंडेल रॉड्रिक्स हे एक लेखक, पर्यावरणवादी आणि समलिंगी हक्कांबाबत लढणारे सामाजिक कार्यकर्तेही होते. वयाच्या 59 व्या वर्षी गोवा इथे राहत्या घरात त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने हे निधन झाल्याचे समोर आले आहे.

2014 साली भारत सरकारने त्यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.

28 मी 1960 रोजी गोवन कॅथलिक कुटुंबात रॉड्रिक्स यांचा जन्म झाला होता. रॉड्रिक्स हे भारतामधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर पैकी एक होते. त्यांनी फॅशनमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात गार्डन वारेली, लॅक्मे कॉस्मेटिक्स आणि डीबीर्स यांच्या डिझाइनद्वारे केली. ते समलिंगी होते 2002 मध्ये पॅरिसमधील नागरी सोहळ्यात त्यांनी जेरोम मॅरेलशी लग्न केले.

(हेही वाचा: पुन्हा एकदा ट्रेंडींग होत आहे 90 च्या दशकातील ही फॅशन; आजही बॉलिवूडच्या तारकांना पाडतेय भुरळ)

2003 मध्ये आलेल्या 'बुम' या चित्रपटात आणि 2002 मध्ये 'ट्रू वेस्ट' या दूरचित्रवाणी नाटकात, त्यांनी कॅमिओ केले होते. 2008 मध्ये आलेल्या 'फॅशन' या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने ट्विटद्वारे वेंडेल रॉड्रिक्स यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियंका चोपडाने घातलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी वेंडेल यांनीही तो ड्रेस प्रियंकाला शोभत नसल्याचे मत मांडले होते, त्यानंतर वेंडेल हे प्रियंकाच्या आईसोबतच अनेकांच्या टीकेचे धनी झाले होते.