धक्कादायक! विधवा मुलीस वडिलांनी 10 हजारात विकले; सामुहिक बलात्कारानंतर पिडीतीने स्वतःला जाळून घेतले
Image Used For Representational Purpose | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशच्या मीरत (Meerut) येथे बलात्कार (Rape) झालेल्या महिलेने स्वतःला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे या महिलेला तिच्या वडिलांनी फक्त 10 हजार रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर या महिलेवर सामुहिक बलात्कार (Gangrape) झाला होता. पोलिसांकडे धाव घेऊनही काहीच मदत न मिळाल्याने या महिलेने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या आगीत ही महिला 80 टक्के जळाली असून, सध्या दिल्लीच्या एका रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार चालू आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला उत्तर प्रदेशच्या हापूर (Hapur) येथे राहणारी आहे. पतीच्या मृत्युनंतर ही महिला आपल्या वडिलांकडे राहत होती. वडिलांनी आणि चुलतीने अवघ्या 10 हजार रुपयांमध्ये या महिलेची विक्री केली. ज्या व्यक्तीने हिला विकत घेतले त्याच्यावर काही लोकांचे कर्ज होते, त्यामुळे त्या लोकांकडे हा या महिलेला घरकामासाठी पाठवायचा. तिथे या महिलेचे शोषण झाले, तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला. (हेही वाचा: दीड वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; चिमुरडीला झुडूपात फेकून देऊन झाला पसार)

या त्रासाला कांटाळलेल्या या महिलेने मदतीसाठी  पोलिसांकडेही धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून या महिलेला कोणतीही मदत केली नाही. अखेर मागच्या महिन्यात, 28 एप्रिलला तिने स्वत:ला पेटवून घेतले. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेचा तपास करायला करून, बलात्काराच्या वेगवेगळया कलमातंर्गत 14 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे संतापजनक प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीन या महिलेस न्याय व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच या असंवेदनशील पोलिसांवरही कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.