Bihar Shocker: Instagram वर Reels बनवण्यापासून रोखल्याने पत्नीने केली पतीची हत्या; आरोपी महिलेला अटक
Instagram, Murder Image (PC - Pixabay)

Bihar Shocker: बिहारमधील बेगुसराय (Begusarai) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीला आपल्या पत्नीला इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) बनवण्यापासून रोखणं चांगलचं महागात पडल आहे. पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. प्राप्त माहितीनुसार, ही महिला इंस्टाग्राम रील्ससाठी व्हिडिओ बनवत होती, ज्याला तिच्या पतीने विरोध केला आणि तिला रील बनवण्यापासून रोखले. महिलेचा राग अनावर झाला आणि तिने सासरच्या मंडळींच्या मदतीने त्याची हत्या केली. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ही घटना खोडबंदपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फाफौत गावात घडली. महेश्वर कुमार राय असे मृताचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी आहे. महेश्वर हा कोलकाता येथे मजुरीचे काम करत होता आणि काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. त्याची पत्नी राणी कुमारी ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असे. (हेही वाचा -Noida Murder Case: पतीच्या डोक्यात हतोडा घालून केली हत्या, आरोपी पत्नीला अटक; नोएडा येथील खळबळजनक घटना)

फाफौत गावातील असलेल्या राणी कुमारीने सुमारे 6 ते 7 वर्षांपूर्वी महेश्वरशी लग्न केले. महेश्वर फाफौत गावात सासरच्या घरी राहत असे. इंस्टाग्राम रील्सवरून त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर राणी कुमारी आणि महेश्वरच्या सासरच्यांनी त्याचा गळा दाबून खून केला. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली जेव्हा मृताच्या भावाने त्याला कोलकाता येथून फोन केला आणि फोनवर कोणीतरी उत्तर दिले नाही.

आरोपी पत्नीला अटक -

महेश्वरच्या भावाने त्याच्या वडिलांना ताबडतोब फाफौत गावात जाण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. महेश्वरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली. (हेही वाचा - Telangana Shocker: 18 लाखांची सुपारी देऊन केली ट्रान्सजेंडर पतीची हत्या, पत्नीसह तीन जण अटकेत; तेलंगणातील धक्कादायक घटना)

प्राप्त माहितीनुसार, महेश्वर कोलकात्याला परतणार होता. मात्र, कोलकात्याला परतण्यापूर्वी त्याने सासरच्या मंडळींची भेट घेतली. परंतु, यादरम्यान पत्नीला रील्स बनवण्यापासून रोखल्याने त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताच्या नातेवाईकांनी सासर आणि पत्नीवर खुनाचा आरोप केला आहे.