देशावर कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट असतानादेखील विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र उचललं जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी दिलेल्या सुचना मोदी सरकारने का पाळल्या नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सुचनांनुसार भारतात कोरोना नियंत्रणासाठी व्हेंटिलेटर आणि सर्जिकल मास्क पुरेशा प्रमाणात साठवून ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. यासाठी WHO ने या वस्तूंची निर्यात बंद करा असंही म्हटलं होतं. परंतु, तरीदेखील सरकारने 19 मार्चपर्यंत या सर्व वस्तूंच्या निर्यातीला परवानगी का दिली? हा सर्व प्रकार कोणत्या शक्तींच्या सांगण्यावरुन खेळण्यात येत आहे? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट नाही का? असे प्रश्न राहुल गांधी यांनी केले आहेत. (हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा 24 मार्च च्या मध्यरात्रीपासून बंद; सरकारचा मोठा निर्णय)
आदरणीय प्रधानमंत्री जी,
WHO की सलाह
1. वेंटिलेटर
2. सर्जिकल मास्क
का पर्याप्त स्टाक रखने के विपरीत भारत सरकार ने 19 मार्च तक इन सभी चीजों के निर्यात की अनुमति क्यों दीं?
ये खिलवाड़ किन ताक़तों की शह पर हुआ? क्या यह आपराधिक साजिश नहीं है?#Coronavirus https://t.co/tNgkngZ936
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 23, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी या पोस्टसोबत पुरावा म्हणून कारवान या न्यूज पोर्टलचा अहवालदेखील जोडला आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलं होतं. टाळ्या वाजवण्यापेक्षा जनतेला टॅक्स सवलत, कर्जफेडीला स्थगिती आदी आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होतं.