कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा 24 मार्च च्या मध्यरात्रीपासून बंद; सरकारचा मोठा निर्णय
Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत विमान वाहतूक (Domestic Air Transport)सेवा 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. देशात तसेच राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय विमान उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. सध्या देशातील सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक करणारी विमाने सुरू असणार आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू, नाईलाजास्तव घ्यावा लागतोय हा निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाचा व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीसोबतचं राज्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. भारतात सध्या 400 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रात 89 जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने संपूर्ण देशात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.