Ashwini Vaishnav On Sleeper Vande Bharat: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे आपली हायस्पीड ट्रेन वंदे भारत स्लीपर (Sleeper Vande Bharat) कोचसह आणणार आहे. पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन या वर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच येत्या एक वर्षात वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचीही योजना आहे.
आतापर्यंत वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कारची सुविधा होती, ज्यामध्ये प्रवाशांना बसून जाण्याची सोय होती. वंदे भारत 500 ते 600 किमी अंतर व्यापते. अशा परिस्थितीत रेल्वेने स्लीपर कोच जोडण्यासंदर्भात सर्वेक्षण केले होते, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे येत्या काळात लांबच्या मार्गावर रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देऊ शकते. (हेही वाचा -Vande Bharat Express for Maharashtra: प्रवाशांसाठी खुशखबर! 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी CSMT-Solapur आणि CSMT-Shirdi वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता)
400 किमी किंवा 5 तासांपेक्षा जास्त लांब प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. स्लीपर कोचची भर पडल्याने प्रवाशांना त्यांच्या आवडत्या ट्रेनमध्ये अधिक सुविधा मिळणार असून प्रवासीही कमी वेळेत त्यांच्या घरी पोहोचतील. त्याचबरोबर यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. (हेही वाचा - Mumbai-Solapur Vande Bharat Express: आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
सुरुवातीला, रेल्वे दिल्ली ते कानपूर आणि वाराणसी ते दिल्ली दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या योजनेवर विचार करत आहे. रेल्वेची देखरेख समितीही या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करत आहे. वंदे भारतसोबतच शताब्दी ट्रेनमधील चेअर कार बदलण्याचाही रेल्वे विचार करत आहे. त्यासाठी ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त आहे, ते मार्ग निश्चित केले जातील.