कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरने रुग्णालयातच आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगड (Aligarh) येथे घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मयत हे कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवस तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत.
दिनेश असे मृत व्यक्तीचे नाव असून ते क्वार्सी भागातील सुर्य विहार कॉलनीतील रहिवाशी आहे. दिनेश यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची लागण झाल्यापासून ते तणावात होते. दरम्यान, दिनेश यांनी शनिवारी रात्री उशीरा रुग्णालयातच आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. एका पोलीस इन्स्पेक्टरच्या आत्महत्येची माहिती झाल्यानंतर दीनदयाल रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अनेकजण हादरून गेले आहेत. हे देखील वाचा- राजस्थान: गोपाष्टमीच्या पूर्वसंध्येला चुरू मध्ये 80 गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. दरम्यान, कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवून टाकले आहे. एवढेच नव्हेतर, आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये काही जणांना केवळ साधा ताप असल्याचे रिपोर्टमध्ये उघड झाले होते. सध्या भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परंतु, देशात अलिकडे कोरोनाची मोठी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.