Plastic Ban: प्लास्टिक वापरल्यास नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) सरकारने आजपासून प्लास्टिक बंदीच्या (Plastic Ban) नियमात मोठा बदल केला आहे. उत्तर प्रदेश येथे प्लास्टीकचा वापर करणाऱ्या नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड आणि सहा महिन्याची शिक्षा ठोठावली जाणार आहे. गृह विभागाच्या प्रमुख सचिवाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणत्याही भागात प्लास्टिक आढळून आल्यास संबधित व्यक्तीसह सरकारी अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

गृह विभागाचे प्रमुख सचिव अवनीश अवस्थी यांनी सोमवारी 26 ऑगस्ट रोजी प्लास्टिक बंदीचे आदेश दिले आहेत. प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या सरकारने अनोखा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील कोणत्याही भागात प्लास्टिक आढळल्यास संबधित नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या कामासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्याला याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे. अवनीश अवस्थी स्वत: काही भागात जाऊन पारख करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019

उत्तर प्रदेशच्या सरकारने अॅन्टी क्राईम नंबर जारी केला आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला प्लास्टिक आढळ्यास अॅन्टी क्राईम नंबरशी संपर्क साधू शकता. लखनऊ येथील वरिष्ठ पोलीस अधिक्षक कलानिधी नैथानी म्हणाल्या की, प्लास्टिक बंदीच्या या मोहिमेत शहरातील अनेक लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्लास्टीक आढळल्यास नागरिक 7839861314 या नंबरावर संपर्क साधू शकतात. तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गुपीत ठेवली जाईल.