Jet Airways Employees Salary Cut: जेट एअरवेज (Jet Airways) अनेक कर्मचार्यांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करणार आहे. यासोबतच विमान कंपनी अनेक कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवणार आहे. त्याच्या नवीन मालकाच्या आगमनानंतरही, जेट एअरवेजचे परिचालन अद्याप सुरू झालेले नाही. जेट एअरवेजच्या भविष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जालान-कॅलरॉक ग्रुपने शुक्रवारी सांगितले की, कंपनीला नजीकच्या भविष्यात रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. समूहाच्या संकल्प योजनेला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने गेल्या वर्षी जूनमध्ये मंजुरी दिली होती.
या वर्षी मे महिन्यात नागरी उड्डान महासंचालनालयाकडून एअरलाइन्सला एअर ऑपरेशनचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही जेट एअरवेजने अद्याप काम सुरू केलेले नाही. या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल. सीईओ आणि सीएफओसाठी कपातीचे प्रमाण जास्त असेल. बाधित कर्मचार्यांसाठी तात्पुरती वेतन कपात आणि वेतनाशिवाय रजा (LWP) 1 डिसेंबरपासून लागू होईल. (हेही वाचा - Drishyam 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाने रचला नवा विक्रम; पहिल्याचं दिवशी केली 'एवढ्या' कोटींची कमाई)
जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विटवर सांगितले की, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्क्यांहून कमी कर्मचारी वेतनाशिवाय तात्पुरत्या रजेवर असतील आणि एक तृतीयांश तात्पुरत्या वेतन कपातीवर असतील. सीईओच्या म्हणण्यानुसार, दोन तृतीयांश कर्मचार्यांवर अजिबात परिणाम झालेला नाही. तसेच कोणत्याही कर्मचार्याला काम सोडण्यास सांगितले गेले नाही. जेट एअरवेजमध्ये सुमारे 250 कर्मचारी काम करतात. याशिवाय, गेल्या महिन्यात राष्ट्रीय कंपनी कायदा अपील प्राधिकरणाने (एनसीएलएटी) समूहाला एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीची थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते.
जालान कॅलरॉक कन्सोर्टियम (जेकेसी) ने एका निवेदनात म्हटले आहे की, "एनसीएलटीच्या प्रक्रियेनुसार कंपनीचा आदेश आमच्या हातात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, परंतु त्यासाठी अधिक वेळ लागत आहे. यामुळे, रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्हाला नजीकच्या भविष्यात कठीण परंतु आवश्यक निर्णय घ्यावे लागतील, कारण विमान कंपनी अद्याप आमच्या ताब्यात आली नाही. त्या दिशेने लक्षणीय प्रगती होत आहे. आम्ही संकल्प योजनेच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही आणि जेट एअरवेज नव्याने सुरू करण्याची आमची वचनबद्धता आहे."