UP Shocker: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात उघड्या खड्ड्यात पडून पाच मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दोन वीटभट्ट्यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एनजीटी माँ भगवती ब्रिक फील्ड आणि श्री राम ब्रिक फील्डच्या बेकायदेशीर खाणकाम संदर्भात एका याचिकेवर सुनावणी करत होती. या वीटभट्ट्यांचे रिकामे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरले असून त्यात चुकून पाच मुलांचा पडून मृत्यू झाला. गेल्या वर्षी २७ जून रोजी ३, ८, १० आणि १२ वर्षांची चार मुले दोन मीटर खोल खड्ड्यात बुडाली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात पुढील महिन्यात एका 13 वर्षीय मुलाचा दुसऱ्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुरावे विचारात घेतल्यानंतर हा दंड ठोठावला. NGT ने 18 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, मां भगवती वीटभट्टी तीन मुलांच्या मृत्यूला जबाबदार आहे, तर श्री राम ब्रिक फील्ड येथे खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. "त्यांनी (वीटभट्ट्यांनी) प्रत्येक मृत मुलाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी," असे आदेशात म्हटले आहे.