Unnao Rape Case: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेने घेतला अखेरचा श्वास
उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू (Photo Credit-PTI)

Unnao Rape Case:  उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) मृत्यू झाला. या बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात पीडिता 90 टक्क्यांपेक्षा जास्त भाजली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गुरुवारी तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पीडितेला व्हेंन्टीलेटवर ठेवण्यात आले होते.

पीडितेवर मागच्या वर्षी बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींपैकी एकाला 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी मात्र फरार आहे. पीडित महिला गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर जात असताना आरोपींनी तिला पेटवण्याचा प्रयत्न केला होता. (हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर, जीव वाचण्याची शक्यता कमी - डॉक्टर)

पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. परंतु, त्याची जामीनावर सुटका झाली होती. गुरुवारी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पीडित तरुणी गंभीर भाजली होती. शुक्रवारी दुपारी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून वाचण्याचा शक्यता कमी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.