उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर, जीव वाचण्याची शक्यता कमी - डॉक्टर
Representative Image-PTI

उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील बलात्कार पीडितेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तिचे जगण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील बलात्कार पीडितेला आरोपींनी पेटवल्याची गंभीर घटना घडली होती.

पीडित महिला गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर जात असताना आरोपींनी तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. यात पीडित महिला 80 ते 90 टक्के भाजली होती. सध्या पीडित महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असंही सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. (हेही वाचा - धक्कादायक! उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार; पीडितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न)

पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. परंतु, त्याची जामीनावर सुटका झाली होती. गुरुवारी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित तरुणी गंभीर भाजली आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.