Representative Image-PTI

हैदराबादमधील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून जाळून टाकल्याची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्नावमध्ये (Unnao) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास 5 तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तिला उपचारासाठी लखनऊमध्ये हलवण्यात आलं आहे. (हेही वाचा - धक्कादायक! तलवारीचा धाक दाखवत आपल्या 5 मुलींवर वडिलांचा गेले 4 वर्षे बलात्कार; दोन लग्न झालेल्या मुलींवरही अत्याचार)

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. परंतु, त्याची जामीनावर सुटका झाली होती. आज सकाळी (गुरुवारी) पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पीडित तरुणी गंभीर भाजली आहे. सध्या तिच्यावर सध्या लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. पीडितेने मार्चमध्ये दोघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. आज पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी तिच्यावर बलात्कार करणारा एक फरार आरोपीही हजर होता.