Toll Tax Booth: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; 6 महिन्यात टोल बुथ हटवणार
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

Toll Tax Booth: प्रवासादरम्यान टोलनाक्यावर जाणारा वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापुढे आता प्रवाशांचा हा वेळ वाचणार आहे. हो. आता देशातील महामार्गांवरील सध्याचे टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महामार्गांवरील टोलनाक्यावरील वेळ आणि ट्राफिक जामपासून सुटका होण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. भारतीय उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे सध्या 40,000 कोटी रुपयांचा टोल महसूल आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 10 कोटी रुपये खंडणीचीही मागणी)

येत्या दोन-तीन वर्षांत तो वाढून 1.40 लाख कोटी होईल. ते म्हणाले, 'देशातील महामार्गांवर असलेले टोल प्लाझा हटवण्यासाठी सरकार जीपीएस आधारित टोल सिस्टिमसारखे तंत्रज्ञान आणण्याचा विचार करत आहे. सहा महिन्यांत नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहने न थांबवता टोल वसूल करण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा) चाचणी योजनेवर काम करत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात टोल प्लाझावर वाहन थांबण्याची सरासरी वेळ 8 मिनिटे होती. 2020-21 आणि 2021-22 मध्ये FASTag लागू केल्यानंतर, टोल प्लाझावर वाहनांची थांबण्याची सरासरी वेळ 47 सेकंदांवर आली आहे.