शिवसेना अयोध्या दौरा: आपल्या 18 खासदारांसह 15 जून रोजी उद्धव ठाकरे घेणार राम लल्लाचे दर्शन
Shiv Sena chief Uddhav Thackeray | Image Courtesy: ANI

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2019) भाजपने (BJP) देशात घवघवीत यश प्राप्त केले. राज्यात एकमेकांवर कुरघोडी करणारे शिवसेना भाजप (Shiv Sena - BJP) यांच्या युतीनेही चांगली कामगिरी करून दाखवली. शिवसेनेने राज्यात 18 जागांवर विजय मिळवला. उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या सर्व 18 खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे खासदारांसह राम दर्शनासाठी अयोध्येकडे कूच करतील. 15 जूनला ते अयोध्येमध्ये रामाचे दर्शन घेतील. आपल्या या अयोध्ये दौऱ्यासह पुन्हा एकदा राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तयारी सुरु करण्याची शक्यता आहे.

नुकतेच, शिवसेनेच्या 18 खासदारांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. आता 15 जूनला ते राम लल्लाचे दर्शन घेऊन आपली नवीन इनिंग सुरु करतील. उद्या उद्धव ठाकरे आपल्या 18 खासदारांसह कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतील. सकाळी 11 वाजता सर्व खासदारांसह ते ते कोल्हापूरला पोहचतील, त्यानंतर 12.30 वाजता सयाजी हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडेल. (हेही वाचा: न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा; उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारलाअल्टिमेटम)

दरम्यान, याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 आणि 25 नोव्हेंबर 2018 रोजी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिर प्रश्नावर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ‘मंदिर वही बनाएंगे’ म्हणत लोकांना आणखी किती काळ मूर्ख बनवाल? अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला होता.