अयोध्या दौरा : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा; उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारलाअल्टिमेटम
उद्धव ठाकरे (Photo Credits: Twitter)

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांच्या समवेत अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत शिवसेना मंत्र्यांकडून ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेश सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर ऊद्धव ठाकरे यांचे लक्ष्मण किलावरही जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सोबत आणलेल्या शिवनेरीवरील पवित्र मातीच्या मंगल कलशाचे अयोध्या वासियांकडू पूजन तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या पादुकांचे पूजन झाल्यानंतर, शिवसेना उत्तर प्रदेशचे राज्य प्रमुख ठाकूर यांनी या सोहळ्यात रामंदिर निर्माणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चांदीची वीट सुपूर्द केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेनं कायदा करावा, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत, राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी सरकारला जाब विचारला आहे.

'मी राजकारण करायला इथे आलेलो नाही, तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला आलो आहे. हिंदूंनी आणखी किती काळ राम मंदिराची वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच. मंदीर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा, राम मंदिराचा अध्यादेश आणणार असाल तर माझा पक्ष शिवसेना नक्की समर्थन देणार.' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला ठणकावले.

आता वेद मंत्रोच्चारात शरयूच्या तीरावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरतीला सुरुवात झाली आहे, याचसोबत मुंबईतील मंदिरांबाहेर महाआरत्यांसाठी गर्दी जमू लागली आहे.