Cyclone Michaung: मुसळधार पावसामुळे चेन्नईत भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Cyclone Michaung: मुसळधार पाऊस (Heavy Rains) आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चेन्नई (Chennai) च्या कानाथूरमध्ये नव्याने बांधलेली भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले लोक झारखंडचे रहिवासी होते. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनार्‍याजवळ चक्रीवादळ मिचौंग येताच सोमवारी रात्री चेन्नईत मुसळधार पाऊस पडला.

भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 24 तासांत शहर आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे चेन्नई विमानतळावरील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली तर काही अन्य वळवण्यात आली. (हेही वाचा -Chennai News: चेन्नईच्या रस्त्यावर मगरीचा वावर, घटनेचा व्हिडिओ आला समोर)

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत. शहरात मुसळधार पावसानंतर पाणी साचल्यामुळे अडकलेल्या पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम परिसरातून सुमारे 15 लोकांना एनडीआरएफच्या पथकांनी वाचवले. धोक्याची पातळी ओलांडून पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बेसिन ब्रिज ते व्यासरपाडी दरम्यानचा पूल क्र.14 बंद करण्यात आला आहे.

चेन्नईहून सुरू होणार्‍या सहा गाड्या म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, कोईम्बतूर कोवई एक्सप्रेस, कोईम्बतूर शताब्दी एक्सप्रेस, KSR बेंगळुरू एसी डबल डेकर एक्सप्रेस, KSR बेंगळुरू वृंदावन एक्सप्रेस, तिरुपती सप्तगिरी एक्सप्रेस सोमवारी रद्द करण्यात आल्या. (वाचा - Cyclone Michong: चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट, 144 गाड्या रद्द; किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता)

दरम्यान, पाणी साचल्याने 14 भुयारी मार्ग बंद करण्यात आले. शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता, तर अनेक सखल भाग जलमय झाले होते. IMD नुसार, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या हद्दीतील शहराच्या बहुतांश भागांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. शेजारील कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला.

याव्यतिरिक्त, दक्षिण रेल्वेने मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत चेन्नईच्या सर्व उपनगरीय विभागांमधील उपनगरीय रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली. दक्षिण रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या विभागांमध्ये फक्त विशेष पॅसेंजर गाड्या चालवल्या जातील.