टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) टीव्ही चॅनेलबाबत नवीन नियम लागू केले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी ‘जितक्या वाहिन्या हव्या आहेत तितकेच पैसे द्या’ असा हा नियम 29 डिसेंबरपासून लागू होणार आहे. मल्टी सर्व्हिस ऑपरेटर्स (MSOS) आणि लोकल केबल ऑपरेटर्सनी (LCOS) हा नियम लागू करावा असे आदेशही ‘ट्राय’ने दिले आहेत. म्हणजेच आता देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे.

काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या डीटीएच (DTH) सेवेने टीव्ही विश्वात क्रांती केली. मात्र यामध्ये  एण्टरटेनमेंट, किड्स, नॉलेज, स्पोर्ट्ससारख्या महागड्या वाहिन्यांचा पॅक निवडावा लागत असे, त्यानुसार दर आकारले जात असत. मात्र यामुळे ग्राहकांना नको असलेया वाहिन्यांचेही पैसे भरावे लागत होते. मात्र आता लागू झालेल्या नव्या नियमानुसार तुम्हाला जितक्या वाहिन्या पहायच्या आहेत त्याच वाहिन्यांचे दर आकारले जाणार आहेत. याद्वारे आता फक्त 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी ग्राहकांना मिळणार आहे. (हेही वाचा : केबल व्यावसायिकांचा संप; उद्या तब्बल तीन तास टीव्ही राहणार बंद)

नेटवर्क कॅपेसिटी फीच्या रूपात ग्राहकांना 100 चॅनेल्ससाठी दरमहा 130 रुपये द्यावे लागतील. जर का तुम्हाला 100 पेक्षा अधिक चॅनेल्स हवे असतील तर पुढच्या प्रत्येक 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये जादा मोजावे लागतील. याव्यतिरिक्त ग्राहकाने जर ‘पे’ चॅनेल्सची निवड केली तर या चॅनेल्सचे आधीपासूनचे ठरलेले दर यात समाविष्ट होतील. ग्राहक एमआरपी किमतीनुसार त्यांना हवी असलेली एकेक वाहिनी निवडू शकतील.

या वाहिन्यांच्या समूहाने त्यांचे स्वतंत्र पॅकही उपलब्ध करून दिले आहेत.

> स्टार समूहाच्या वाहिन्यांचा एकत्रित पॅक 49 रुपये.

> झीचा हिंदी फॅमिली पॅक (एसडी) 45 रुपये असून, मराठी फॅमिली पॅक (एसडी) 50 रुपये आहे.

> सोनी समूहाने ‘हॅपी इंडिया पॅक’ या शीर्षकांतर्गत सिल्व्हर, प्लॅटिनम अशी वर्गवारी करत विविध पॅक आणले आहेत. यात सर्वसाधारण पॅकची किंमत 31 रुपये असून, प्लॅटिनम पॅकची 90 रुपये किंमत आहे.

> कलर्स समूहाने ‘कलर्सवाला पॅक’असे नाव देऊन 20 वाहिन्यांसाठी 25 रुपयांच्या पॅकची घोषणा केली आहे. (हेही वाचा : 33 वस्तूंवरील GST मध्ये कपात, नवीन दर 1 जानेवारी 2019 पासून लागू- अर्थमंत्री अरुण जेटली)