केबल व्यावसायिकांचा संप; उद्या तब्बल तीन तास टीव्ही राहणार बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

ट्राय (TRAI) ने टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नवे नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार तुम्हाला जितक्या वाहिन्या हव्या आहेत त्याच वाहिन्यांसाठी दर आकारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रायच्या नवीन नियमांसोबत केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत, देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी 27 डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 7 ते 10 या वेळेत केबल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रायने ग्राहकांना वाहिनीनिवडीचे स्वातंत्र्य दिले, तर वाहिन्यांना त्यांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले. नवीन नियमाप्रमाणे 80 टक्के महसूल ब्रॉडकास्टर्सना व उर्वरित 20 टक्के एमएसओ व एलसीओना देण्याचे ठरविण्यात आले आहे. हे प्रमाण बदलून ब्रॉडकास्टर्सना ना 30 टक्के, एमएसओना 30 टक्के व एलएसओना 40 टक्के द्यावे, अशी मागणी केबल संघटनांकडून करण्यात आली आहे. (हेही वाचा : टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)

या केबल व्यावसायिकांनी ‘ट्राय’च्या विरोधात आतापर्यंत न्यायालयात 27 याचिका दाखल केल्या आहेत. त्यांचा निकालही गुरुवार, 27 डिसेंबर रोजीच लागणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केबल संघटनांची बुधवार, 26 डिसेंबर रोजी एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ब्लॅकआउटचा - केबल बंदचा निर्णय होण्याची शक्यता आहे.  मात्र ट्रायने याची गंभीर दखल घेत ब्लॅकआउट करू दिले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.