Srinagar Encounter: श्रीनगरमधील चकमकीत भारतीय जवानांकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
Srinagar Encounter (Photo Credit - ANI)

Srinagar Encounter: जम्मू-काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकी सुरचं आहेत. श्रीनगरमधील (Srinagar) पांथा चौकात (Pantha Chowk) काल रात्री भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यात आला आहे. यात एका पोलिस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी अद्याप ऑपरेशन सुरू आहे.

शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पोलिस अधिकारी बाबू राम यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात काश्मीर झोन पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान, श्रीनगर येथील पांथा चौकात दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर नाका परिसरात गोळीबार केला. त्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या संबंधित परिसर घेरला. या भागात शोधाशोध सुरू असताना दहशतवाद्यांनी पुन्हा जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. (हेही वाचा - Pulwama Encounter: पुलवामाच्या झाडोरा भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर एका सैनिकाचा मृत्यू)

दरम्यान, शुक्रवारी रात्री जम्मू-कश्मीर खोऱ्यात पुलवामाच्या झाडोरा भागात झालेल्या चकमकीत पोलिस आणि सुरक्षा दलाने 3 अज्ञात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या चकमकीत एका सैनिकाचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्रीनगरमधील पीआरओ डिफेन्सने माहिती दिली होती.