Republic Day 2024: यंदा 1132 पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान; 'या' राज्याला सर्वाधिक शौर्य पुरस्कार
Gallantry Award प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Republic Day 2024: केंद्र सरकार (Central Government) ने गुरुवारी राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार (National Gallantry and Service Awards) जाहीर केले. गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) जारी केलेल्या यादीनुसार, यावर्षी पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील 1132 कर्मचाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांपैकी दोन जवानांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (PGM) देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय, 275 जवानांना शौर्य पुरस्कार (GM) प्रदान केले जातील. या एकूण 277 शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी सर्वाधिक 119 कर्मचारी माओवाद आणि नक्षलवाद प्रभावित भागात तैनात आहेत. याशिवाय 133 जवान जम्मू-काश्मीर भागातील आहेत. तसेच इतर क्षेत्रातील 25 जवानांनाही त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Republic Day 2024: येत्या 26 जानेवारी रोजी भारत साजरा करणार 75 वा प्रजासत्ताक दिन; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron असतील सोहळ्याचे प्रमुख पाहुणे)

या राज्याला सर्वाधिक शौर्य पुरस्कार -

275 शौर्य पुरस्कारांपैकी जास्तीत जास्त 72 शौर्य पुरस्कार जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 26 जवानांना हा सन्मान मिळणार आहे. यानंतर झारखंडमधील 23, महाराष्ट्रातील 18, ओडिशातील 15, दिल्लीतील 8, CRPF मधील 65 आणि SSB-CAPF आणि इतर राज्य-केंद्रशासित प्रदेशातील सेवांमधील 21 जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Republic Day 2024 Maharashtra Tableau: यंदा प्रजासत्ताक दिनावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला समर्पित असेल महाराष्ट्राचा चित्ररथ; जाणून घ्या काय आहे संकल्पना)

या शौर्य पुरस्कारांशिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते 102 पदके विशिष्ट सेवेसाठी दिली जातील. यामध्ये पोलीस सेवेला 94, अग्निशमन सेवेला चार, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेला चार पदके देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या विशेष सेवा पुरस्कारांशिवाय गुणवंत सेवेसाठी 753 पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 667 पोलीस सेवेला, 32 अग्निशमन सेवेला, 27 नागरी संरक्षण-होमगार्ड सेवेला आणि 27 सुधारात्मक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.