सोन्याच्या दराने गाठला उच्चांकी दर, 46 हजार प्रति तोळ्याकडे वाटचाल; जाणून घ्या आजचा Gold Rate
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Todays Gold Rate:  सद्य आर्थिक परिस्थिती आणि कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव पाहून गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. यामुळेच दिल्ली सराफा बाजारात आज सोने (Gold) व चांदी (Silver) अशा दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढलेली दिसून आली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 773 रुपयांची वाढ झाली. मात्र चांदीचा दरात प्रतिकिलोनुसार 192 रुपयांनी घसरणही झाली. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झालेली दिसून आली. रुपया 65 पैशांनी घसरून 73.99 वर आला.

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 773 रुपयांनी वाढून 45,720 रुपये झाला. यापूर्वी गुरुवारी सोन्याची किंमत 44,570 रुपये होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,678 डॉलर औंस होती. आज चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या एका किलोच्या किंमतीत 192 रुपयांची घट झाली, त्यानंतर नवीन किंमत 48,180 रुपये झाली. याआधी गुरुवारी चांदीचा दर 47,988 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीची किंमत आज 17.34 डॉलर प्रति औंस होती. (हेही वाचा: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

जगभरातील शेअर बाजारात झालेली विक्री आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दारात तेजी आली असल्याचे, विश्लेषकांचे म्हणणे आहे. देशांतर्गत स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम मौल्यवान धातूंवरही दिसून आला आहे. नवनीत दमानी, उपाध्यक्ष, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड धातूंच्या वाढलेल्या दरासाठी कोरोना विषाणू कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.