बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढलेला मुलगा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील बलसामंद गावात 18 महिन्यांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल 48 तास म्हणजेच दोन दिवसानंतर या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफचे पथक यासाठी प्रयत्न करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी हा चिमुरडा या 60 फुट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर लगेचच त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. दरम्यान त्याला ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी कॅमेराचीही व्यवस्था केली गेली होती.

नदीम असे या मुलाचे नाव असून, खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला. त्याचे आईवडील शेजारीच मजुरीचे काम करतात. पाच भावंडापैकी हा सर्वात लहान मुलगा आहे. नदीम खाली पडल्याची माहिती मिळताच त्वरीत त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. या बोअरवेलपासून 20 फुट अंतरावर एक समांतर बोअरवेल खोदण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही बोअरवेलमध्ये भुयार खोदून या बाळाला बाहेर काढण्यात आले आहे. हे बाळ पूर्णतः सुरक्षित असून, त्वरीत त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला तब्बल 16 तासांनंतर बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश)

नुकतीच अशीच एक घटना पुण्यात घडली होती. पुण्यातील मंचर येथे 200 फुट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची तब्बल 16 तासांनंतर सुटका करण्यात आली होती. रवी पंडित असे या मुलाचे नाव असून तो 6 वर्षांचा होता. रवीदेखील खेळता खेळता अशा झाकण नसलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता.