चीनला मोठा झटका! केंद्राने रद्द केली 44 सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची निविदा
Vande Bharat Express (Photo Credit: Twitter)

भारताने चीनला मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची (Semi High Speed Train) निविदा रद्द केली आहे. या निविदेमध्ये 44 सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी चीनला कंत्राट देण्यात आलं होतं. रेल्वे मंत्रालय पुढील आठवड्यात नव्याने निविदा मागवणार आहे. यात केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतीय कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, 44 सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी काही कंपन्या स्पर्धेमध्ये होत्या. यामध्ये एका विदेशी कंपनीचादेखील समावेश होता. मात्र, Pioneer Fil-Med Pvt Ltd या कंपनीत चीनी कंपनी CRRC Yongji Electric Company Ltd भागीदार आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाने 44 ट्रेनची निविदा रद्द केली आहे. चीनमधील CRRC Yongji Electric Company Ltd आणि गुरुग्राम येथील Pioneer Fil-Med Pvt Ltd यांनी 2015 मध्ये एकत्रित ही कंपनी सुरु केली होती. (हेही वाचा - When Will Coronavirus End: कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर)

रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 44 सेमी हाय स्पीड ट्रेनच्या (वंदे भारत) निर्मितीचं कत्राट रद्द करण्यात आलं आहे. एका आठवड्यात ऑर्डर काढून नव्याने कंत्राट मागवले जातील. यामध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य असेल, असंही रेल्वे मंत्रालयाने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने चीनविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली होती. भारताने चीनच्या 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. आता सेमी हाय स्पीड ट्रेनचे कंत्राट रद्द केल्याने चीनला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.