2018 मधील सर्वात चर्चित विषय म्हणून #MeToo कडे पहिले जाते. यामध्ये चित्रपटसृष्टीसह इतर अनेक क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी वाचा फोडली होती. असाच एक धक्कादायक प्रकार सरकारी टीव्ही नेटवर्क दूरदर्शन (Doordarshan) मध्ये घडल्याचे समोर आले आहे. देशातील दूरदर्शनच्या विविध कार्यालयातील तब्बल 10 महिलांनी आपल्या वरिष्ठांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये यातील तीन महिलांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.
करार नुतनीकरण करण्याच्या बदल्यात वरिष्ठांनी लैंगिक छळ केला असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. यामधील एक घटना तर 2015 मधील आहे. या महिलेने आपल्या दोन वरिष्ठांबद्दल तक्रार केली होती, मात्र या आरोपानंतर त्या महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले. याबाबत वकील वरुणा भंडारी यांनी 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये अंतर्गत तक्रार समितीने लैंगिक गैरवर्तनविरोधात लक्ष न दिल्याचा दावा केला आहे. तसेच तक्रार करूनही, वेळोवेळी ही गोष्ट समितीच्या कानावर घालूनही यावर कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याचे या महिलांनी सांगितले आहे. (हेही वाचा : संस्कारी बाबूजी 'अलोक नाथ'वर बलात्काराचा आरोप)
वरुणा भंडारी यांनी एका महिलेशी बातचीत केली त्यातून ही गोष्ट समजली. त्यानंतर त्यांनी तपास सुरु केला असता अजून 10 महिलांनी आपले लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. यामध्ये दिल्लीतील सहा, भोपाळमधील आणि जयपूरमधील एक तर इतर ठिकाणच्या दोन महिलांचा समावेश आहे. यातील एका महिलेने तक्रार केल्यानंतर मार्चपासून तिचे वेतन थांबवले असल्याचे तिने सांगितले. तर दुसऱ्या महिलेने याविरोधात आवाज उठवला असता तिला धमकी देऊन, शिवीगाळ करण्यात आली.