संस्कारी बाबूजी 'अलोक नाथ'वर बलात्काराचा आरोप; ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळून केला होता निर्मातीचा लैंगिक छळ
आलोक नाथ (Photo Credits: PTI)

हॉलीवूडमध्ये सुरु झालेली #metoo चळवळ आता बॉलीवूडमध्ये जोर धरत असलेली दिसून येत आहे. स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियावर ही मोहिम सुरू झाली. नुकतेच तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यानंतर इतर अभिनेत्रींनीदेखील आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल व्हाच फोडायला सुरुवात केली. विकास बहल, कैलाश खेर, रजत कपूर, चेतन भगत, तन्मय भट्ट अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. यातच अजून एक नामांकित आणि धक्कादायक नाव समोर येत आहे, ते म्हणजे बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ. 1990 मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्माती आणि लेखिकेने मालिकेतील संस्कारी अभिनेत्याने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून ही माहिती शेअर केली.

आपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, ‘एका पार्टीमध्ये आम्ही सर्व मित्र जमलो होतो. माझ्या ड्रिंक्समध्ये कोणीतरी काहीतरी मिसळले होते. मला याबाबत थोडीशी जाणीव झाली. मात्र मी लक्ष दिले नाही. साधारण रात्री 2 वा. मी त्या पार्टीमधून बाहेर पडले. मी चालतच घरी जायला निघाले. थोड्यावेळात एका व्यक्तीने मला लिफ्ट देऊ केली. मला अंधुकसे काही आठवत होते की कोणीतरी मला जबरदस्तीने दारू पाजत होते. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या. माझ्यावर लैंगिक अत्याचारासोबत बलात्कारही झाला होता. मी माझ्या मित्रांना ही गोष्ट सांगितली मात्र सर्वांनी मला हे विसरून जाण्याचा सल्ला दिला’

या संपूर्ण पोस्टमध्ये अलोक नाथ यांचा कुठेही थेट उल्लेख नाही, मात्र पोस्टमध्ये आरोपीचे नाव संस्कारी अभिनेता असे लिहिले आहे. परंतु हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अलोक नाथ असल्याचा तर्क बॉलिवूड वर्तुळात केला जातोय.