Telangana: सेल्फी घेणे जीवावर बेतले! एकाच कुटुंबियांतील 3 मुलींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एकाच कुटुंबियातील 3 अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडल्याने (Drown) मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तेलंगणाच्या (Telangana) निर्मल जिल्ह्यात (Nirmal) रविवारी सांयकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात या मुली सिंचन टाकीमध्ये पडल्या. ज्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुनीता ( वय, 16) आणि वैशाली (वय, 14) आणि त्यांची चुलत बहीण अंजली (वय, 14) असे मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियावर दुख:चे डोंगर कोसळले आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली रविवारी घरी परतल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. परंतु, सोमवारी ग्रामस्थांनी त्या तिघींची मृतदेह तलावात तरंगताना पाहिल्यानंतर पोलीसांना कळवले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तिघींचेही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी या तिन्ही मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच सेल्फी घेत असताना त्या पाण्यात पडल्याचा पोलिसांना संशय आहे. हे देखील वाचा-Aurangabad Fire: औरंगाबादमध्ये प्लास्टीच्या वस्तूंनी भरलेल्या गोडाऊनला आग

सुनीता आणि वैशाली यांनी आपली आई मंगलाबाई आणि चुलतभावासमवेत रविवारी दुपारी त्यांच्या शेतात काही वेळ घालवला आणि त्यांच्या मोबाइलवर फोटो काढले. यानंतर काही फोटो घेण्यासाठी मुली जवळच्या टँकवर गेल्या. जिथे सेल्फी घेत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. दरम्यान, मुली घरी परतल्या असतील असा विचार करून मंगलाबाई घरी गेल्या. त्यावेळी एकही मुलगी घरी परतली नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर नातेवाईकांनी लगेच त्यांचा शोध सुरु केला. तसेच पोलीस ठाण्यातही त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.