गुजरातच्या (Gujarat) सुरत (Surat) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कतरगाम (Katargam) परिसरातील एका महिला डॉक्टरने आपल्या आई आणि बहिणींची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हेतर, या महिला डॉक्टरने स्वत:ही झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने, तिचा जीव वाचला असून तिच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला डॉक्टरची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
डॉ. दर्शना प्रजापती असे महिला डॉक्टरचे नाव आहे. दर्शना या त्यांची आई मंजुलाबेन (वय, 59) आणि बहिण फाल्गुनीसोबत (वय, 29) कतरगाम परिसरात राहत होत्या. मात्र, शनिवारी दर्शना प्रजापती यांनी मंजुलाबेन आणि फाल्गुनी यांना बेशुद्धचे इन्जेक्शन दिले. ज्यामुळे या दोघींचाही मृत्यू झाला. त्यानंतर दर्शना यांनी स्वत:ही झोपेच्या तब्बल 26 गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दर्शना यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सध्या त्यांच्यावर जवळच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Bihar: वडिलांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह; मुलगा, मुलीसह सुनेलाही अटक
या घटनेनंतर पोलिसांनी डॉक्टर महिलेचा जबाब नोंदवला आहे. ज्यात तिने असे म्हटले आहे की, ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती. ज्यामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. परंतु, तिची आई-बहिण तिच्यावर अवलंबून होते. यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी तिने आई आणि बहिणीलाही ठार करण्याचा ठरवले. त्यानुसार, तिने या दोघींनाही इंजेक्शनातून 10 मिली एनेस्थेटिक औषध दिले, जे एकावेळी रुग्णाला 2 मिली पेक्षा जास्त दिले जात नाही. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहे.